मुंबई
खाजगी रुग्णालयांवर बंदीची मागणी; रुग्णांकडून अवाजवी बिलवसुलीचा आरोप….
एक्स-रे, एमआरआय, सिटी स्कॅनसाठी लाखोंची आकारणी; केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा – नागरिकांची मागणी….
देशभरात खाजगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अशा रुग्णालयांवर कठोर नियंत्रण आणण्याची किंवा बंदी घालण्याची मागणी पुढे येत आहे. रुग्णांकडून उपचारांच्या नावाखाली अवाजवी वसुली केली जात असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर औषधोपचार, बेड चार्जेस, डॉक्टर फी यांसह विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात बिल आकारले जात असल्याचे सांगितले जाते. विशेषतः एक्स-रे, एमआरआय, सिटी स्कॅन तसेच विविध रक्त तपासण्यांसाठी हजारो ते लाखो रुपये आकारले जात असल्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडत आहेत.
यामुळे आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचीही तक्रार आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून खाजगी रुग्णालयांच्या दरांवर नियंत्रण आणावे, पारदर्शकता सुनिश्चित करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



