*पालघर ब्रेकिंग..*
*पालघर पोलिसांना जे. पी. गर्गचा शोध लागेना; दीड महिना उलटला तरी मुख्य आरोपी फरार!*
*आरोपी फरार, पण कंपनीच्या ऑनलाइन मीटिंग सुरूच; पोलिसांकडून अभय दिल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप!*
विराज प्रोफाईल कंपनीचे कर्मचारी स्वर्गीय प्रदीप जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जे. पी. गर्ग अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होऊनही दीड महिन्याहून अधिक काळ उलटला असून आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा लागत नसल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे जे. पी. गर्ग हे आपल्या कंपनीच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे “पोलिसांना आरोपी सापडत नाही, पण तो ऑनलाइन सक्रिय कसा?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
स्व. प्रदीप जाधव यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. आरोपीला जाणीवपूर्वक अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, तातडीने आरोपीला अटक करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असूनही अद्याप आरोपीला अटक न झाल्याने न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. दीड महिना उलटून गेल्यानंतरही मुख्य आरोपी मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासाची गती आणि परिणामकारकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता या प्रकरणात पालघर पोलीस नेमकी कोणती भूमिका घेतात, आरोपीला अटक कधी होते आणि प्रदीप जाधव यांच्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



