बुलढाणा
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेना महिला आघाडीचा अभिवादन कार्यक्रम…
संविधानामुळे महिलांना मिळाले अधिकार – शारदाताई पाटील यांचे प्रतिपादन…
जळगावजामोद तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शारदाताई पाटील यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. बाबासाहेबांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यामुळे देशातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळाला, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले आहेत. “याच संविधानामुळे आज मी एक महिला म्हणून राजकारणात जिल्हा पदाधिकारी म्हणून कार्य करू शकत आहे,” असे सांगत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणात बाबासाहेबांचे योगदान अधोरेखित केले.
यावेळी उपस्थित महिलांना व कार्यकर्त्यांना बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करून समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



