बुलढाणा
*“५७ दिवस प्रशासन बधीरच! बुलढाण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर अॅड. प्रवीण सुरडकर यांचा बैठा सत्याग्रह — समस्यांचे तातडीने निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा”*
बुलढाणा शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिलेल्या निवेदनाला तब्बल ५७ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अॅड. प्रवीण सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांनी ३० जानेवारी २०२६ रोजी, महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिनाचे औचित्य साधत, जिल्हा परिषद आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततामय बैठा सत्याग्रह केला.
या सत्याग्रहादरम्यान देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, बुलढाणा शहरात विविध नागरी समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
रविवार बाजारानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो, मात्र रविवारी रात्रीच साफसफाई न झाल्यामुळे दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच रविवार बाजारामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील जुनी नळ योजना बंद करून नवीन नळ जोडण्या दिल्यानंतर झालेल्या खोदकामामुळे रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी नवीन पाइपलाइनमध्ये लिकेज असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असून, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. रहिवासी भागातील साफसफाई बाबतही प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप सत्याग्रहकर्त्यांनी केला.
याशिवाय बुलढाणा–मलकापूर रस्त्यालगत तिन ते पाच ठिकाणी ३ बाय २ आकाराचे खड्डे खोदून तसेच सोडून देण्यात आले आहेत. चैतन्यवाडी व तिवारी यांच्या वाड्याजवळही अशाच प्रकारचे धोकादायक खड्डे असल्याने अपघात, शारीरिक इजा अथवा जिवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला. या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्यात, यासाठी गांधीजींच्या विचारांना अभिवादन करत शांततामय मार्गाने सत्याग्रह करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, समस्यांचे तत्काळ निराकरण न झाल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा
अॅड. प्रवीण सुरडकर, अॅड. गुणवंत नाटेकर, अॅड. अमोलकुमार गवई, अॅड. अक्षय तोत्रे, अॅड. राम अंभोरे, अॅड. पी. बी. नरोटे, भागवत राजपूत, अॅड. मदन मगर, अॅड. राहुल मोरे, अॅड. राहुल तायडे आदी सत्याग्रहात सहभागी नागरिकांनी दिला आहे.



