बुलढाणा फ्लॅश
*“निसर्ग संवर्धनासाठी बुलढाणेकर पुढे सरसावले;..*
*क्रीडा संकुल परिसरातील जंगल टेकडी हिरवीगार करण्याचा निर्धार”…*
बुलढाणा शहराला चारही बाजूंनी निसर्गाचे वरदान लाभले असून, या निसर्गाचे जतन व संवर्धन करण्यासाठी शहरातील सुज्ञ नागरिक पुढे सरसावताना दिसत आहेत. शहरातील क्रीडा संकुल परिसरात असलेल्या जंगल टेकडीवर नागरिकांच्या पुढाकारातून देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे…..
बुलढाणा शहराच्या आजूबाजूला असलेली जंगले मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीमुळे कमी झाली असून, त्याचा परिणाम निसर्गचक्रावर होताना दिसत आहे. ऋतूंमध्ये बदल, वाढता उष्णतेचा प्रकोप आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका यामुळे मानवाच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही गंभीर परिस्थिती ओळखून शहरातील तरुण, युवक व नागरिकांनी जंगल परिसर व टेकड्या हिरव्यागार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे…..
क्रीडा संकुल परिसरातील जंगल टेकडीवर लावण्यात आलेल्या देशी वृक्षांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यात येत असून, पाणी देणे, संरक्षण करणे आणि नियमित देखभाल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. हा उपक्रम केवळ पर्यावरण रक्षणापुरता मर्यादित न राहता भावी पिढीसाठी स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण देण्याचा संकल्प असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले…..
निसर्ग संवर्धन ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, जिथे जिथे वृक्ष नाहीत तिथे वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. बुलढाणेकरांच्या या उपक्रमामुळे शहर पुन्हा एकदा हिरवळीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे….



