2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप…* *यजमान बुलढाण्याचे सर्वसाधारण विजेतेपद, अमरावती उपविजेता..*

बुलढाणा

*जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप…*

*यजमान बुलढाण्याचे सर्वसाधारण विजेतेपद, अमरावती उपविजेता..*

स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पार पडलेल्या जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. घरच्या मैदानाचा व प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा फायदा घेत यजमान बुलढाणा जिल्हा परिषदेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत वर्चस्व सिद्ध केले, तर अमरावती जिल्हा परिषद उपविजेती ठरली.
संगीतमय वातावरण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार धीरज लिंगाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खांदे, उपजिल्हाधिकारी शेलार, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, आशिष पवार, प्रमोद एंडोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धा व महोत्सवात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्हा परिषदांमधील सुमारे १५०० खेळाडूंनी सहभाग घेतला. उद्घाटन दिवशी झालेल्या पथसंचलनात यवतमाळने प्रथम क्रमांक पटकावला, तर बुलढाण्याला द्वितीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक स्पर्धांमध्ये टेनिक्वाइट प्रकारात बुलढाण्याने ६ पारितोषिके मिळवली, तर अमरावतीने ५ बक्षिसे जिंकली. बॅडमिंटनमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ प्रकारात विजेते व उपविजेतेपद मिळवले. दिव्यांग कर्मचारी गटात बुलढाण्याला १२ तर अमरावतीला १० प्रकारात यश मिळाले.
क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो यांसारख्या सांघिक स्पर्धांमध्येही चुरशीच्या लढती झाल्या. अखेरीस गुणतालिकेत आघाडी राखत बुलढाण्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आणि अमरावतीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यांना संमिश्र यश मिळाले.
समारोपप्रसंगी विजेत्या खेळाडू व संघांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी क्रीडाध्वज अवतरण करून तो सन २०२७ च्या यजमानपदासाठी वाशिम जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी गजानन डाबेराव यांच्याकडे सुपूर्द केला. सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व किरण वाघमारे यांनी केले, तर प्रमोद एंडोले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Related Articles

ताज्या बातम्या