*“हलगी वाजती”वर आ संजय गायकवाडांचा ठेका…*
*शिवजयंती कार्यक्रमात जल्लोषपूर्ण वातावरण..*

बुलढाणा
आ संजय गायकवाड यांनी “हलगी वाजती” या जोशपूर्ण गीतावर ठेका धरत शिवप्रेमींसोबत उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने बुलढाणा येथे आयोजित शिवजयंती निमित्त कार्यक्रमात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले…. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शाहिरी पोवाडे, स्फूर्तीगीते आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे स्वराज्याचा इतिहास आणि मराठी अस्मितेचा जागर करण्यात आला. कलाकारांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर “हलगी वाजती” या गीतावर आमदार गायकवाड यांनी शिवप्रेमींसोबत ठेका धरत आनंद व्यक्त केला. त्यांच्या या सहभागामुळे कार्यक्रमात अधिकच रंगत आली.
कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी काम करण्याचा संदेश देण्यात आला…
या प्रसंगी समितीचे पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवगर्जना, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



