बुलढाणा
*सामूहिक कॉपी प्रकरणावर कारवाईनंतर भरारी पथकाच्या सन्मानाची मागणी…*
- *माजी मंत्री सुबोध सावजी यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र..*
- वाशिम जिल्ह्यातील एका विद्यालयात उघडकीस आलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदन सादर करत सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणाऱ्या भरारी पथकातील सदस्यांचा शासकीय स्तरावर सन्मान करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी स्पष्टपणे केली आहे. १६ तारखेला वाशिम जिल्ह्यातील एका विद्यालयात परीक्षा सुरू असताना सामूहिक कॉपी होत असल्याचे समोर आले. यानंतर भरारी पथकाने अचानक छापा टाकत तपासणी केली. तपासात काही कर्मचाऱ्यांची निष्काळजीपणा आढळून आल्याने संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात सावजी यांनी म्हटले आहे की, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी अशा पथकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नियमांची अंमलबजावणी करत गैरप्रकार उघड करणाऱ्या भरारी पथकातील सदस्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात अशा कारवायांना अधिक बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता व शिस्त यावर पुन्हा चर्चा सुरू झाली असून दोषींवर कठोर कारवाई करावी व भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे ..



