बुलढाणा ब्रेकिंग
*केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच एमआरआय सेवा ठप्प;…*
*वर्षभरापासून एम आर आय मशीन बंद, रुग्णांना आर्थिक भुर्दंड….*

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बसविण्यात आलेले अत्याधुनिक एमआरआय मशीन मागील तब्बल एक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हा जिल्हा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचाच असताना, उद्घाटनाअभावी मशीन सुरूच न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेले हे एमआरआय मशीन सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी आणि तातडीची तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि उद्घाटन न झाल्यामुळे ही यंत्रणा धूळ खात पडली आहे. परिणामी गंभीर आजार, अपघातग्रस्त रुग्ण, मेंदू व मणक्याच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना खाजगी केंद्रांमध्ये एमआरआय तपासणी करावी लागत आहे. खाजगी एमआरआय केंद्रांमध्ये एका तपासणीसाठी ४ ते ८ हजार रुपये खर्च येत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. अनेकांना कर्ज काढून किंवा नातेवाईकांकडून मदत घेऊन तपासणी करावी लागत असल्याची स्थिती आहे.
दरम्यान, रुग्ण व सामाजिक संघटनांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “सर्व सुविधा उपलब्ध असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मशीन बंद ठेवणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन एमआरआय सेवा सुरू करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली ही सुविधा लवकरात लवकर सुरू होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



