बुलढाणा
*बुलढाणा येथे प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक जाहीर कीर्तनाचे आयोजन…*
प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात भव्य प्रबोधनात्मक जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव समिती, बुलढाणा २०२६ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष प्रसंगी राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या धम्मनीतीवर आणि “धम्मविजय हा खरा विजय” या संदेशावर आधारित विचारमंथन या कीर्तनातून मांडले जाणार आहे.
कार्यक्रम मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार असून, स्थळ गांधी भवन, जयरस्तंभ चौक, बुलढाणा येथे निश्चित करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक सलोखा आणि नैतिक मूल्यांची जपणूक या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सम्राट अशोक यांच्या शांतता, बंधुता आणि मानवतावादी विचारांचा जागर समाजात व्हावा, यासाठी या जाहीर कीर्तनाचा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.



