बुलढाणा ब्रेकिंग
*सारशिव गावात जलसमाधी आंदोलन; स्मशानभूमी, अतिक्रमण व पाणी प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक*

बुलढाणा जिल्ह्यातील सारशिव गावात विविध प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले असून, तीन जणांनी गावालगतच्या तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण हटवावे, तसेच गट नंबर 19 मधील सातार जमीन ही हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव असून ती तात्काळ खुली करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

याशिवाय, गावातील सरकारी विहिरीवरून सुरू असलेला बेकायदा सिंचनासाठीचा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी संबंधित स्मशानभूमीभोवती झटका मशीनद्वारे तार कंपाउंड करून त्यामध्ये करंट सोडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकारामुळे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाता येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी तातडीने मोकळी करून देण्यात यावी, या मागणीसह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सध्या आंदोलन सुरू असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



