23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

केशव शिवणी येथे श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य सोहळा; कीर्तन, महाप्रसाद व मान्यवरांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरण…

बुलढाणा

*केशव शिवणी येथे श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य सोहळा; कीर्तन, महाप्रसाद व मान्यवरांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरण…

सिंदखेडराजा

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील श्री क्षेत्र केशव शिवणी येथे भगवान श्रीराम जन्मोत्सव (श्रीराम नवमी) अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव धार्मिक रंगात न्हाऊन निघाले असून केशवराज मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
या उत्सवानिमित्त कीर्तन, भजन, धार्मिक प्रवचन आणि महाप्रसाद यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी यांच्या प्रभावी कीर्तनाने भक्तिरसाची सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. रमेश महाराज जायभाये यांच्या सुमधुर वाणीतील काल्याचे कीर्तन रंगून गेले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे जीवनचरित्र सांगत गोमातेच्या सेवेसाठी प्रेरणादायी संदेश दिला.
उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरलेले ह.भ.प. प्रेमानंद महाराज देशमुख यांच्या ओजस्वी कीर्तनाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. आपल्या कीर्तनातून त्यांनी भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनमूल्यांचा उल्लेख करत माता-पिता, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज राहावे, असे प्रभावी आवाहन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कीर्तनानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन मुर्डेश्वर संस्थानचे अध्यक्ष तथा केशवराज संस्थानचे विश्वस्त वसंतराव उदावंत बंधू तसेच केशव शिवणी ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.
या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे, किनगाव राजा ठाणेदार, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ, राज्यपाल पुरस्कार प्राप्त डॉ. डी. एस. शिंदे, डॉ. विजयराव नागरे तसेच लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर “जय श्रीराम” च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि उत्सवाला भव्यतेची उंची प्राप्त झाली.

Related Articles

ताज्या बातम्या