बुलढाणा
चिखलीतील रेणुका माता यात्रा महोत्सवात आ. संजय गायकवाड यांची भक्तीमय उपस्थिती…
सपत्नीक मातेला पातळ अर्पण; महाप्रसाद वाटप व सामाजिक कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग…

चिखली शहरात चैत्र नवरात्रीच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रेणुका माता यात्रा महोत्सवात यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडले. या मंगलमय सोहळ्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी सपत्नीक उपस्थित राहून रेणुका मातेस पातळ अर्पण करत मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड यांचीही उपस्थिती लाभली.

मंदिर परिसर “जय रेणुका माता”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. यावेळी आमदार गायकवाड दाम्पत्याने राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मातेकडे प्रार्थना केली. त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यात्रेनिमित्त शहरात ठिकठिकाणी आ. गायकवाड यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मंदिर समितीच्या वतीनेही त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच विविध महाप्रसाद कार्यक्रमात त्यांच्या हस्ते हजारो भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. स्वतः उभे राहून सेवा केल्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
याचवेळी त्यांनी शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. या भेटींमुळे संस्थांना नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि जनसंपर्काचा सुंदर संगम साधणारा हा यात्रा महोत्सव चिखलीकरांसाठी अविस्मरणीय ठरला.



