*केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातही नव्याने सुरू होणार 10 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा*
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 10 ठिकाणच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये नॅशनल बँकांच्या नविन शाखा सुरू करण्याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली आहे. केंद्रीयमंत्री आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयकृत बँका सुरू होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँकेची सेवा मिळावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय बँकेच्या अधिकाऱ्यां सोबत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत ज्या ग्रामिण ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा नाहीत, अशा ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरु कराव्यात, असे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे मांगणी सुध्दा करण्यात आली होती. त्यानुसार आता बुलढाणा तालुक्यातील सागवान आणि साखळी बुद्रुक चिखली तालुक्यातील इसोली आणि सवना खामगाव तालुक्यातील घाटपुरी आणि सुटाळा खुर्द मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक व देऊळगाव साकर्शा मोताळा तालुक्यातील कोथळी आणि संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बुद्रुक येथे लवकरच राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा सुरू होऊन या भागातील नागरिकांना सेवा सुविधा मिळणार आहे.
पुर्वी जिल्हा केंद्रीय बँकेच्या जिल्हाभरात शाखा असल्याने शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या वतीने विनासायास पिक कर्ज मिळत होते परंतु जिल्हा बँकेच्या शाखा बँक अवसायानात गेल्याने बंद पडल्या. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना पिककर्जासाठी खाजगी सावकारांकडुन अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज घ्यावे लागते. जिल्हयामध्ये राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखांची अजुनही गरज असल्याने जिल्हा बँकाच्या बंद पडलेल्या शाखांच्या ठिकाणी तसेच जास्त लोकसंख्यांच्या गावांमध्ये सर्वे करुन राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा सुरु करण्याबाबत प्रतापराव जाधव यांनी सदरहु बैठकीत निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने आता नव्याने सर्वे होवुन इतर बँकांच्या शाखा सुद्धा जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये सुरू होणार आहे.
*प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे मानले आभार!*
बुलढाणा जिल्हयातील ग्रामिण व शहरी भागात नविन राष्ट्रीयकृत शाखांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिल्याने ना.प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे आभार मानले आहे.ग्रामीण भागातील
जिल्हा बँकेच्या बंद झालेल्या शाखेच्या ठिकाणी तसेच मोठया गावात राष्ट्रीयकृत बँका सुरु करण्याची मागणी अर्थ मंत्रालयाकडे केली होती. या मागणीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या शाखा ग्रामीण क्षेत्रांमध्ये कार्यान्वित होणार आहे.



