बुलढाणा फ्लॅश
*यशोदा नगरमध्ये एकही बौद्ध समाजाचे घर नसतानाही भीम जयंती उत्साहात साजरी..*
*दहा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
यशोदा नगर परिसरात बौद्ध समाजाचे एकही घर नसतानाही येथील रहिवाशांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. विशेष म्हणजे हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असून सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण करत आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी नागरिकांनी एकत्र येत पंचशील ध्वजाला वंदन केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी रुपेश खांडे, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भांडगे तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करून समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशोदा नगरमधील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले असून, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



