बुलढाणा ब्रेकिंग
*समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित…*
*लोणार तालुक्यातील शिवनी पिसा शिवारात घटना; टायर फुटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज…*
मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर आज सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना चॅनेल क्रमांक 296, शिवनी पिसा शिवार, ता. लोणार, पोलीस स्टेशन मेहकर हद्दीत घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, MH 38 F 3899 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स बसचा टायर अचानक फुटल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बसमध्ये सुमारे 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच चालक व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तात्काळ बसमधून बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस, महामार्ग पोलीस तसेच समृद्धी महामार्ग प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले आणि प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान, बसला लागलेल्या आगीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.



