बुलढाणा ब्रेकिंग
अभिजित दीपके यांच्यावर हल्ल्यानंतर संतापाचा उद्रेक; ‘झेड प्लस सुरक्षा द्या’ — ऑल इंडिया पँथर सेनेची आक्रमक मागणी!
“केंद्र सरकार अभिजित दीपके यांचा बेनझीर भुट्टोसारखा अंत होण्याची वाट पाहत आहे का?” — दीपक केदार यांचा थेट सवाल
राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान गर्दीचा फायदा घेत कोकरूज जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. या घटनेचा विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, ऑल इंडिया पँथर सेनेने केंद्र सरकारवर थेट निशाणा साधत अभिजित दीपके यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिजित दीपके यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून सामाजिक परिवर्तनाची भूमिका मांडणाऱ्या नेतृत्वाला घाबरविण्याचा आणि दबावाखाली आणण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या घटना लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
केदार यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत, “केंद्र सरकार अभिजित दीपके यांचा बेनझीर भुट्टोसारखा दुर्दैवी अंत होण्याची वाट पाहत आहे का?” असा थेट आणि आक्रमक सवाल केला. देशभरात वाढत्या राजकीय आणि सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर दीपके यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करत त्यांनी त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली.
या हल्ल्यामुळे दीपके यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अभिजित दीपके यांच्या सुरक्षेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ऑल इंडिया पँथर सेनेकडून देण्यात आला आहे.



