बुलढाणा ब्रेकिंग
*35 हजारांच्या बदल्यात साडेतीन लाखांचे आमिष; बनावट नोटांसह दोन जण जेरबंद!*
*‘चिल्ड्रन बँक’च्या 699 बनावट 500 रुपयांच्या नोटा, चार मोबाईल आणि दुचाकी जप्त*
मलकापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांच्या व्यवहारातून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हैदराबादहून 35 हजार रुपयांच्या बदल्यात 3 लाख 50 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून लूटमार करण्याचा डाव आखल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून ईश्वर अशोक मेसरे (वय 34) व गौतम मुकुंदा तायडे (वय 22) या दोघांना मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ‘चिल्ड्रन बँक’ असे लिहिलेल्या 500 रुपयांच्या 699 बनावट नोटा, एक दुचाकी आणि चार मोबाईल फोन असा एकूण 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास सुरू आहे.



