बुलढाणा
*एसटीच्या उत्पन्नवाढीत बुलढाणा विभाग राज्यात प्रथम; जयश्रीताई शेळके यांनी विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांचा केला सत्कार*
*भेटीदरम्यान रिक्षाचालकांच्या समस्यांकडेही वेध; सकारात्मक तोडगा काढण्याचे विभाग नियंत्रकांचे आश्वासन*
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाने संपूर्ण राज्यात एसटीच्या उत्पन्नवाढीत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल उबाठाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा विभागाच्या विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा शहरातील रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्याही विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विषयांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन शुभांगी सिरसाट यांनी दिले.
महिला अधिकारी म्हणून सक्षम नेतृत्व, शिस्तबद्ध प्रशासन आणि कार्यक्षम नियोजनाच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी करता येते, हे शुभांगी सिरसाट यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा विभागाने एसटीच्या उत्पन्नवाढीत राज्यात अव्वल स्थान मिळवून विभागाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शुभांगी सिरसाट यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.



