बुलढाणा ब्रेकिंग
*मातृतीर्थ सिंदखेडराजातील तालुका क्रीडा संकुल बनले दारूचा अड्डा; खेळाडूंच्या स्वप्नांची होत आहे राखरांगोळी!*
*लाखोंचा देखभाल खर्च कुठे जातो? जीर्ण, कुलूपबंद क्रीडा संकुलाकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष..*
सिंदखेडराजा
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र जन्मभूमीची ओळख असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा शहरातील तालुका क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. खेळाडू घडविण्यासाठी उभारण्यात आलेले हे क्रीडा संकुल आज अक्षरशः दारूचा अड्डा बनल्याचे वास्तव समोर आले असून, मैदानावर सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि क्रीडा विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सन २००४ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते, तत्कालीन आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत या तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनाचा कोनशीला आजही या परिसरात आहे. मात्र त्यानंतर या क्रीडा संकुलाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
क्रीडा संकुलातील इमारत जीर्ण झाली असून ती कायम कुलूपबंद अवस्थेत आहे. आत कोणतेही क्रीडा साहित्य उपलब्ध नसल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले. खेळाडूंना सरावासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचाही पूर्णतः अभाव आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील आणि जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंनी सराव तरी कुठे करायचा, असा संतप्त सवाल खेळाडू आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, या क्रीडा संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात मैदानाची दुरवस्था, जीर्ण इमारत, कुलूपबंद कार्यालय आणि सुविधांचा अभाव पाहता हा निधी नेमका खर्च कुठे होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाचा निधी खर्च होत असताना त्याचे परिणाम मात्र कुठेच दिसून येत नसल्याने चौकशीची मागणी जोर धरत आहे.
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात ग्रामीण भागातील क्रीडा संकुलांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सिंदखेडराजा तालुका क्रीडा संकुल त्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे. खेळाडूंना सुविधा देण्याऐवजी हे संकुल समाजकंटकांच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तातडीने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन क्रीडा संकुलाची पाहणी करावी, संपूर्ण परिसर दारूमुक्त करून सुरक्षित करावा, जीर्ण इमारतीची दुरुस्ती करावी आणि खेळाडूंना आवश्यक सर्व क्रीडा साहित्य व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याच्या क्रीडामंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राज्यातील तालुका क्रीडा संकुलांची विशेष तपासणी करून ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी केली आहे.
एकीकडे खेळाडूंना ऑलिम्पिकचे स्वप्न दाखवले जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्यासाठी उभारलेले क्रीडा संकुलच दारूचा अड्डा बनत असेल, तर नव्या पिढीतील खेळाडू घडणार तरी कसे? हा प्रश्न आता प्रशासनाने उत्तरासह सोडविण्याची वेळ आली आहे.



