बुलढाणा ब्रेकिंग
*”दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात आंदोलन पेटणार; २३ जुलैला हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय मूक रॅली!”*
*”विद्यार्थ्यांवर लाठ्या, सरकारचे मौन; बुलढाण्यात विद्यार्थी-पालक-शिक्षक एकत्र येत न्यायासाठी रस्त्यावर!”*
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध शैक्षणिक प्रश्नांवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आता बुलढाण्यातही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी गुरुवार, २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बुलढाणा शहरात भव्य मूक रॅली काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
‘संवेदनशील बुलढाणेकर’ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली ही मूक रॅली शहरातील हुतात्मा स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीत इयत्ता दहावीपासून पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीत विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला हा केवळ एका आंदोलनावरचा हल्ला नसून देशाच्या भविष्यावरच घाला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
बैठकीत बोलताना अनेकांनी, “न्याय मागणारे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. पेपरफुटीच्या घटनांमुळे आधीच विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर लाठी उगारून त्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवणे हे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना तडा देणारे आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
विद्यार्थ्यांचे प्रश्न हे कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक चौकटीत बसणारे नसून देशाच्या भविष्यासंदर्भातील आहेत. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी पक्ष, संघटना, जात-धर्म यापलीकडे जाऊन प्रत्येक संवेदनशील नागरिकाने मूक रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिल्लीतील घटनेनंतर देशभरातून उमटत असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात निघणारी ही मूक रॅली लक्षवेधी ठरणार असून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



