बुलढाणा
बुलढाण्यातील रुपेश भगवान कंकाळ यांना इतिहास विषयात आचार्य पदवी…
‘भारतातील टाटा उद्योगसमूहाच्या कार्याची ऐतिहासिक मिमांसा’ या विषयावर केले संशोधन; जिजामाता महाविद्यालयात पीएचडी ओपन डिफेन्स…
बुलढाणा : स्थानिक जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथील इतिहास विभागातील संशोधक विद्यार्थी रुपेश भगवान कंकाळ यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची इतिहास विषयातील आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नामदेव वा. ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.
जिजामाता महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नितीन चांगोले यांच्या मार्गदर्शनाखाली रुपेश कंकाळ यांच्या पीएच.डी.चा ओपन डिफेन्स वायवा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. जे. जे. जाधव होते. विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. सुरेश माळशिखरे (एसपीएम महाविद्यालय, चिखली) तर परीक्षक म्हणून प्रा. डॉ. मारुती जाधव (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, जि. जळगाव) यांनी संशोधनाचे परीक्षण केले.
रुपेश भगवान कंकाळ यांनी “भारतातील टाटा उद्योगसमूहाच्या कार्याची ऐतिहासिक मिमांसा (कालखंड इ. स. १८६८ ते २०१२)” या विषयावर सखोल इतिहास संशोधन केले. टाटा उद्योगसमूहाच्या कार्याचा ऐतिहासिक प्रवास, त्याचा भारताच्या औद्योगिक विकासातील सहभाग तसेच विविध कालखंडातील योगदानाचा त्यांनी अभ्यास केला. मार्गदर्शक, परीक्षक व विषय तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत त्यांच्या संशोधनाचे परीक्षण झाल्यानंतर त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्याची शिफारस करण्यात आली.
यावेळी IQAC समन्वयक प्रा. डॉ. सुबोध चिंचोले, डॉ. संजय साळवे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, इतिहास संशोधक विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. उमेश राऊत, अनिकेत गावंडे, प्रदीप बानाईत, प्रा. यजुवेंद्र राजपूत आदी इतिहास संशोधक विद्यार्थ्यांनीही उपस्थित राहून रुपेश कंकाळ यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमानंतर रुपेश भगवान कंकाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी सौ. नेहा रुपेश कंकाळ तसेच संपूर्ण कंकाळ परिवार उपस्थित होता. आपल्या यशाचे श्रेय रुपेश कंकाळ यांनी त्यांचे वडील स्व. भगवान कंकाळ, आई गंगासागर कंकाळ तसेच आप्तस्वकीयांना दिले. त्यांच्या यशात तुषार काचकुरे, श्रीकांत खिर्डेकर, निलेश गायकवाड यांच्यासह मित्रपरिवाराचेही योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
रुपेश कंकाळ यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, मित्रपरिवार व आप्तस्वकीयांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



