बुलढाणा फ्लॅश
*हेक्टरी एक लाख रुपये द्या; बुलढाण्यात उबाठाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा; हजारो शेतकऱ्यांचा सहभाग…*
*दुष्काळाचा फसवा जीआर काढून शेतकऱ्यांची थट्टा करू नका; खात्यात मदत जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; जयश्री शेळके यांचा सरकारला इशारा…*
अँकर :
बुलढाणा जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जमा करावी, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना उबाठाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात आणि खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
जिल्ह्यात दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ दुष्काळाचा जीआर काढून शेतकऱ्यांची थट्टा करू नये, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी सरकारच्या दुष्काळविषयक निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने नकोत, तर त्यांच्या खात्यात हेक्टरी एक लाख रुपये तातडीने जमा झाले पाहिजेत. दुष्काळाचा फसवा जीआर काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका, असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदतीची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार कमी होणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे या आक्रोश मोर्चाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. आता या आक्रोश मोर्चानंतर सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



