बुलढाणा फ्लॅश
दिवसा दुष्काळाचे संकट, रात्री चोरट्यांची दहशत!
बुलढाणा दुष्काळग्रस्त जाहीर करा; मलकापूर-मोताळा-नांदुऱ्यातील चोरीचे सत्र रोखा — अस्तित्व संघटनेचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
मलकापूर : पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांची उभी पिके संकटात सापडली असतानाच मलकापूर, मोताळा आणि नांदुरा परिसरात चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुहेरी संकटातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी अस्तित्व संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रेमलताताई सोनोने यांनी केली.
२३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता मोताळा येथे प्रेमलताताई सोनोने यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, नुकसानीचे पंचनामे करून प्रलंबित पीकविमा मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, मलकापूर-मोताळा-नांदुरा परिसरातील चोरीच्या घटनांनाही आळा घालण्याची मागणी करण्यात आली. रात्री नागरिकांना घर, शेत आणि परिसराच्या सुरक्षेसाठी जागून पहारा द्यावा लागत असल्याने पोलिसांची गस्त वाढवावी, नाकाबंदी करावी आणि संशयित हालचालींवर प्रभावी नजर ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
प्रमुख मागण्या : बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीची मदत व पीकविमा द्यावा, नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच मलकापूर-मोताळा-नांदुरा परिसरातील चोरीचे सत्र रोखण्यासाठी पोलिसांची प्रभावी गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवाव्यात.



