बुलढाणा ब्रेकिंग
*येळगाव धरणात ८० टक्के जलसाठा; बुलढाण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू…*
*पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईची चिंता; अनधिकृत पाणीउपशावर कारवाई, दिवाळीपर्यंत गाळ काढण्याचे उद्दिष्ट…*
यंदाच्या पावसाळ्यात येळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुलढाणा शहराच्या पाणीप्रश्नाला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, जुलै महिन्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या येळगाव धरणात ८० टक्के जलसाठा उपलब्ध असून, आगामी काळात शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. आमदार संजय गायकवाड आणि नगरपरिषद प्रशासनाच्या बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. धरणात मुबलक जलसाठा असला, तरी पावसाचा दीर्घ खंड आणि उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. अनधिकृत पाणीउपशावर कारवाई
येळगाव धरण परिसरातून होणाऱ्या अनधिकृत पाणीउपशावर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. धरणातील पाणीसाठा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित राहावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच धरणातील गाळ काढण्याचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
*३४ बोअरवेल आणि विहिरींचे नियोजन*
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात ३४ बोअरवेल आणि पाच ते सहा विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे पर्यायी नियोजन करण्याची तयारी सुरू आहे. धरणातील उपलब्ध साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी या पर्यायी स्रोतांचा उपयोग करण्यावर भर दिला जाणार आहे.
नोव्हेंबरपासून खासगी बांधकामांना पाणीपुरवठा बंद?
पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून खासगी बांधकामांसाठी होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन आहे. याशिवाय शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याचे नियोजन समजावे, यासाठी झोननिहाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्याचीही तयारी सुरू आहे.
एकीकडे धरणात ८० टक्के जलसाठा असल्याने दिलासा मिळत असला, तरी दुसरीकडे पावसाचा खंड आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून वापर, पर्यायी जलस्रोतांचे नियोजन आणि अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण या उपाययोजना बुलढाणा शहरासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे…



