बुलढाणा
*बुलढाण्यात तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची ढालसावंगी येथे धडक कारवाई….
*खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर गुन्ह्यांत हवा असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; एलसीबी पथकाची यशस्वी कामगिरी*
बुलढाणा जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे व फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मागील तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढालसावंगी येथून अटक केली आहे. अजय विठ्ठल गुळवे (वय २५, रा. ढालसावंगी, ता. जि. बुलढाणा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई
बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अजय गुळवे हा आपल्या ढालसावंगी येथील गावी आला आहे.
या माहितीची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी ढालसावंगी येथे सापळा रचला. त्यानंतर शोध घेऊन अजय गुळवे याला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले.
खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
अजय गुळवे याच्याविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५७/२०२४ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२६, ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो मागील तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि खामगावचे पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील मिसाळ, अनुपकुमार मेहेर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंड यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.



