बुलढाणा ब्रेकिंग
*नांद्राकोळी–पांगरी रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा! क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन*
*रस्त्यावर मोठमोठे खड्डे; अपघातांचा धोका वाढला, वाहनधारक त्रस्त*
नांद्राकोळी–साखळी–पांगरी–उबरहंडे या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नितीन अरविंदराव सोनटक्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर केले.
नांद्राकोळी, साखळी, पांगरी आणि उबरहंडे परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवास करताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असून, दुचाकीस्वारांसह इतर वाहनधारकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघातांचा धोका वाढत असल्याने या मार्गाची तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू करावे आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना दररोज होणारा त्रास लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी नितीन सोनटक्के, अमोल भाऊ मोरे आणि ॲड. प्रवीण भाऊ सुरडकर उपस्थित होते.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेतो आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कधी सुरू होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



