28.3 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img

कु. आरती खंडागळे हिची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.

कु. आरती खंडागळे हिची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.

बुलढाणा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत नागपूर येथे आयोजित युनिव्हर्सिटी मॅचेस स्पर्धेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कोराडी येथील विद्यार्थिनी कु. आरती रमेश खंडागळे हिने बॉक्सिंग खेळात ५४ ते ५७ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णयश संपादन केले.
मात्र या यशामागे केवळ खेळ नाही, तर संघर्षाची, त्यागाची आणि जिद्दीची एक भावनिक कहाणी दडलेली आहे. घरातील हालाखीची परिस्थिती, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडचणी असूनही आरतीने आपले स्वप्न सोडले नाही. गावापासून दूर राहत तिने अपार मेहनत घेतली. तिच्या या जिद्दीवर व विश्वासावर तिचे वडील रमेश खंडागळे कायम ठाम राहिले.
जेव्हा आरतीने अंतिम लढत जिंकत विजय निश्चित केला, तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. “माझी मुलगी अडचणींवर मात करून देशासाठी नाव कमवतेय, हे पाहणे हाच माझा खरा विजय आहे,” असे भावूक शब्द त्यांनी सांगितले. स्पर्धेदरम्यान आरतीने आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य व झुंजार खेळाचे अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या यशात मार्गदर्शक श्री. संकेत धामंदे सर (एन. एस. कोच) यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे तिच्या खेळात सातत्य व धार निर्माण झाली.
या कामगिरीच्या जोरावर कु. आरती खंडागळेची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असल्यामुळे बॉक्सिंग परिवार, शेगाव यांच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी बॉक्सिंग असोसिएशन बुलढाणा यांच्यावतीने असोसिएशनचे अध्यक्ष माननीय विठ्ठलराव लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश इंगळे उपाध्यक्ष, प्रा. डॉ. संतोष आंबेकर कोषाध्यक्ष, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे जिल्हा सचिव श्री संकेत धामंदे, विनोद टिकार सदस्य, राज सोळंकी सहसचिव तसेच जिल्हा प्रशिक्षक संकेत रामदास सरोदे ,पी. यू. राठोड सर यांनी कुमारी आरती हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले असून सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .संघर्षातून उभारी घेऊन आणि मनात जिद्द असेल तर मुलीही कशामध्ये कमी राहू शकत नाहीत. हेही मुलींसाठी आरतीने दाखवून दिले आहे. ही खेळाडू अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या