28.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

मेहूणाराजात संत चोखामेळा जयंती उत्साहात साजरी — प्रा. कमलेश खिल्लारे यांचे प्रेरणादायी विचार

मेहूणाराजात संत चोखामेळा जयंती उत्साहात साजरी — प्रा. कमलेश खिल्लारे यांचे प्रेरणादायी विचार

बुलढाणा :
तेराव्या शतकात समाजात उपेक्षित, दलित, स्त्रिया यांचा आवाज कुठेही ऐकू येत नव्हता. दलित मुक्ती, स्त्री अधिकार यांसारख्या संकल्पनांचा जन्मही झाला नव्हता. अशा काळात संत चोखामेळा व त्यांच्या कुटुंबीयांनी वंचितांच्या वेदनांना शब्दरूप दिले, मानवतेचे गीत गायले आणि समतेचा दीप प्रज्वलित केला, असे प्रतिपादन प्रा. कमलेश खिल्लारे यांनी केले.


ते देऊळगावराजा तालुक्यातील मेहूणाराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या महान विद्रोही संत चोखामेळा यांच्या ७५८ व्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून
आमदार मनोज कायंदे (सिंदखेड राजा),
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
यांची उपस्थिती होती. तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. खिल्लारे पुढे म्हणाले की, संत चोखामेळा यांनी केवळ भक्ती केली नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. समाजातील विषमता, अस्पृश्यता, अन्याय यांना आपल्या अभंगातून छेद दिला. त्यांनी माणसामाणसातील भेद नाकारून समतेचा मार्ग दाखवला, जो आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.


अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संत चोखामेळा यांचे विचार हे केवळ धार्मिक नसून सामाजिक क्रांतीचे मूळ आहेत. आजही जात, लिंग, आर्थिक विषमता कायम असून संत चोखामेळा यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.
आमदार मनोज कायंदे यांनी शासनस्तरावर सामाजिक समतेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले, तर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संत परंपरेचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात अभंग गायन, पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

Related Articles

ताज्या बातम्या