बुलढाणा ब्रेक :
*ई-केवायसीतील त्रुटींमुळे 30 हजार ‘लाडक्या बहिणींचा’ लाभ थांबला;…*
*महिला-बालकल्याण कार्यालयात महिलांची गर्दी…*

बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जवळपास 30 हजार महिलांचा लाभ अचानक थांबल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार अशी अफवा पसरल्याने, गेल्या दोन महिन्यांपासून लाभ का मिळत नाही याची चौकशी करण्यासाठी महिलांनी थेट जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात गर्दी केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात या योजनेचा साडेसहा लाखांहून अधिक महिला लाभार्थींनी लाभ घेतला आहे. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी आढळल्याने सुमारे 30 हजार महिलांचे अनुदान अडचणीत आले आहे. आधार-बँक लिंकिंग, अपूर्ण माहिती, ओटीपी न येणे, नावातील तफावत अशा विविध कारणांमुळे अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे समोर येत आहे.
लाभ थांबल्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, ग्रामीण भागातील महिलांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे महिलांमध्ये चिंता व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाभ कायमस्वरूपी बंद होणार नसून, ई-केवायसीतील त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर लाभ पुन्हा सुरू होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, लाभार्थी महिलांकडून ई-केवायसी दुरुस्तीसाठी विशेष मोहिम राबवावी, तसेच दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही काही महिलांनी दिला आहे.
एकूणच, ई-केवायसीतील तांत्रिक अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबल्याने हजारो महिलांना फटका बसला असून, प्रशासनाकडून लवकरात लवकर दिलासा मिळेल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



