बुलढाणा ब्रेकिंग
*बुलढाणा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरविलेले 54 मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात…*

बुलढाणा शहर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हरविलेले तब्बल 54 मोबाईल फोन शोधून काढत मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. या मोबाईलची अंदाजे किंमत सुमारे 10 लाख रुपये इतकी आहे.
पोलीस स्टेशन, बुलढाणा शहर अंतर्गत कार्यान्वित असलेल्या CENTRAL EQUIPMENT IDENTITY REGISTER (CEIR) या केंद्र सरकारच्या पोर्टलचा वापर करून बुलढाणा शहर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. मागील महिन्यात CEIR पोर्टलच्या माध्यमातून 38 मोबाईल हॅन्डसेट तर प्रत्यक्ष तपासातून 16 मोबाईल हॅन्डसेट असे विविध कंपन्यांचे एकूण 54 मोबाईल हस्तगत करण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलचा सखोल तपास करून त्यांच्या मूळ मालकांची ओळख पटविण्यात आली. मालकी हक्काबाबत खात्री केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड, Pro. IPS अदित्य सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा सुधीर पाटील तसेच बुलढाणा शहरचे ठाणेदार रवि राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई बुलढाणा शहरचे ठाणेदार रवि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस स्टेशन स्तरावर CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे तसेच पोलीस अंमलदार पोकॉ. युवराज शिंदे (वनं-2177), पो.कॉ. दीपक चव्हाण (बनं-1207), पोकॉ. विनोद बोरे (बनं-425), पो.कॉ. मनोज सोनुने (वनं-1184) आणि महिला पोलीस अंमलदार मपोकॉ. मोहिनी चव्हाण (बनं-2328) यांनी मोलाची भूमिका बजावली.
हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी बुलढाणा शहर पोलिसांचे आभार मानले असून, CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे शक्य असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये अधिक दृढ झाला आहे. बुलढाणा शहर पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे.



