बुलढाणा
*शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षा शारदाताई पाटील यांच्या हस्ते चावरा इलोरा येथे ‘लगीनगाठ’ पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न….*
जळगावजामोद तालुक्यातील चावरा इलोरा येथील संत सखाराम महाराज संस्थानात मराठा पाटील समाज सेवा समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लगीनगाठ’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षा शारदाताई पाटील च्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. श्री संत सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास समाजातील विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट) यांच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा शारदाताई पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत मराठा पाटील समाज सेवा समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. संत सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाच्या निमित्ताने समाजात एकोपा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘लगीनगाठ’ हे पुस्तक विवाहसंस्थेतील सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्ये अधोरेखित करणारे असून तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. समाजातील परंपरा जपण्यास व सकारात्मक विचार रुजविण्यास या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल, असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत मराठा पाटील समाज सेवा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



