बुलढाणा
*आरेगांव–वरदडा व विविध रस्त्यांसाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद;*
*रस्ते दुरुस्तीबाबत तात्काळ कारवाईचे आदेश**
मेहकर तालुक्यातील आरेगांव, वरदडा तसेच परिसरातील विविध रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच रस्ते दुरुस्तीचे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात काल बुलढाणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांची पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान आरेगांव व वरदडा रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, वाहनचालक व शेतकऱ्यांना होत असलेला त्रास तसेच पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्तीची आवश्यकता याबाबत ठोस मागणी करण्यात आली. विशेषतः या मार्गांवरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने रस्त्यांची दुरवस्था ही अपघातांना निमंत्रण देणारी ठरत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
या मागणीची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांनी तत्काळ मेहकर येथील उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. लोलुरे यांना बोलावून संबंधित रस्त्यांची पाहणी करून दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या बैठकीत जनतेच्या प्रश्नांवर त्वरित प्रतिसाद देण्याची प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली असून, रस्ते दुरुस्तीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने लवकरच काम प्रत्यक्षात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सदर निर्णयामुळे आरेगांव, वरदडा परिसरातील सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांच्या सुरक्षिततेस मोठा दिलासा मिळणार असून, दैनंदिन वाहतुकीतील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, रस्ते दुरुस्तीचे काम वेळेत, दर्जेदार आणि टिकाऊ व्हावे, यासाठी संबंधित पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.



