- बुलढाणा
*राष्ट्रपतींच्या भेटीत शेगाव ‘निर्मनुष्य’; नागरिकांना दर्शन नाकारल्याने संताप…*
*तब्बल सहा वर्षानंतर कोविडचा तो काळ आठवला…लॉंकडाऊन…*

-
शेगाव येथे देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या आगमनावेळी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र या कडेकोट बंदोबस्तामुळे सामान्य नागरिकांना राष्ट्रपतींचे दर्शन घेता न आल्याने शेगावकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपतींच्या आगमनाच्या सुमारे चार तास आधीच संपूर्ण शहर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते पूर्णतः ओस पडले होते. ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक भागांत नागरिकांना घराबाहेर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही ठिकाणी खिडकीतूनही बाहेर पाहू नये, अशा सूचना पोलिसांकडून दिल्या गेल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेने मागील सहा वर्षांपूर्वीचा कोविडचा काळ लॉंकडाऊन आठवला…
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही ४ ते ५ तास प्रतीक्षा करावी लागली. अचानक लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. “राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य असायलाच हवे; मात्र आपल्या देशाच्या राष्ट्रपती शहरात येऊनही आम्हाला त्यांचे दर्शन घेता आले नाही, ही खंत राहिली,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
शेगावात राष्ट्रपतींचे आगमन हे शहरासाठी अभिमानास्पद मानले जात असले, तरी अतिसुरक्षेमुळे सामान्य जनतेपासून हा कार्यक्रम दूर राहिल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे….



