14.6 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

मलकापूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार;…* *हमीभावासाठी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन, उग्र आंदोलनाचा इशारा..*

बुलढाणा ब्रेकिंग

*मलकापूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार;…*

*हमीभावासाठी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन, उग्र आंदोलनाचा इशारा..*


मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हमीभावाच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीनुसार (हमीभाव) मका, तूर व कापूस खरेदी केली जात नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आणि प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.
मका घेऊनच कार्यालयासमोर धडक
शेकडो शेतकरी ट्रॅक्टर व वाहनांमधून मका घेऊन थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले. “हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू”, “शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बाजार समितीत व खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कर्जबाजारीपणामुळे टोकाची भूमिका
यंदाच्या हंगामात उत्पादन खर्च वाढला, मात्र पिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. काही शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत “शेती परवडत नसेल तर गांजा पेरणीची परवानगी द्या, अन्यथा आम्हाला किडनी विकण्याची वेळ येत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. या विधानामुळे आंदोलनाची तीव्रता अधोरेखित झाली.
प्रशासनाला निवेदन; उग्र आंदोलनाचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हमीभावानुसार तूर, मका व कापूस तातडीने खरेदी करावी, खरेदी केंद्रे सुरू करावीत व शेतकऱ्यांना त्वरित पैसे अदा करावेत, अशी मागणी केली. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात रस्तारोको, ठिय्या आंदोलन व उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले असून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मागणीवर शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या