बुलढाणा
*देवपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर पूर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात अनावरण; आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते सोहळा संपन्न…*

चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्राम देवपूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर पूर्णाकृती पुतळ्याचे विधिवत पूजन करून अनावरण उत्साहात व जल्लोषात पार पडले. आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला.
अनावरण सोहळ्यानिमित्त ग्राम देवपूर परिसरात सकाळपासूनच उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण गाव भगव्या पताकांनी सजले होते. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. हजारो शिवप्रेमी माता-भगिनी व युवकांच्या उपस्थितीत शिवरायांची महाआरती करण्यात आली.
यावेळी बोलताना आ. संजय गायकवाड म्हणाले, “शिवरायांचा आदर्श आजही समाजाला दिशा देणारा आहे. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि सुशासनाच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल. युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करावे.”
कार्यक्रमास शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवप्रेमी नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
ग्राम देवपूर येथे उभारण्यात आलेला सिंहासनाधीश्वर पुतळा परिसरातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, गावाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर घालणारा ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण देवपूर गावात उत्साह, अभिमान आणि शिवभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.



