बुलढाणा
*उमेद “राजमाता महोत्सव 2026” चा 5 मार्चला शुभारंभ…*
*महोत्सवामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या 150 स्टॉल चे भव्य प्रदर्शन ..*
ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बुलढाणा व कृषि विभाग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता महोत्सव 2026” चे आयोजन दिनांक 05 मार्च 2026 ते 09 मार्च 2026 पर्यंत सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल बुलढाणा येथे करण्यात आलेले आहे. या जिल्हा विक्री प्रदर्शन, मिनी सरस व पौष्टिक तृणधान्य कृषी महोत्सवामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या 150 स्टॉल चे भव्य प्रदर्शन या जिजामाता नगरीने ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात उभारले जाणार आहे. मागील वर्षी पार पडलेल्या विभागीय प्रदर्शिनीला बुलढाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता व महिलांनी तयार केलेल्या मालाची व ग्रामीण भागातील महिलांच्या रुचकर हातांनी तयार केलेल्या जेवणामुळे खवय्याचा आनंद गगनाला मावेनासा झाला होता.
05 मार्च 2026 ला सकाळी “राजमाता महोत्सव 2026” प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. ना. प्रतापराव जाधव तसेच केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मा. ना. रक्षा खंडसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सदर महोत्सवाचे अध्यक्षस्थान मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. मकरंद जाधव (पाटील) भूषविणार आहे. या राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील उमेद अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या उत्कृष्ठ व दर्जेदार उत्पादने तसेच अन्नधान्य पिके-पौष्टिक तृणधान्य अंतर्गत उत्पादनाचा मेळावा बघण्यास मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ “राजमाता महोत्सव 2026” च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. प्रदर्शनी दरम्यान सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील उमेद अभियानंतर्गत स्थापन झालेल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेले उत्कृष्ट व दर्जेदार उत्पादनाची तसेच उत्तमरित्या घरच्या खमंग चविणे बनविलेल्या खाद्य पदार्थांचे स्टॉल हे दिनांक 05 मार्च 2026 ते 09 मार्च 2026 बुलढाणेकरांच्या सेवार्थ मांडण्यात येणार आहे. एकंदरीत 150 स्टॉल ही महिलांनी स्वतः तयार केलेल्या दर्जेदार खाद्य पदार्थ, साडी, महिलापयोगी वस्तु, हस्तकला वस्तु, मूर्ती, आरोग्य विषयक काही प्रॉडक्ट, कृषी साहित्य इत्यादी वस्तु उत्कृष्टरित्या पॅकिंग आणि लेबलिंग करून स्टॉलमध्ये विक्री करीता ठेवण्यात येणार आहे. राजमाता महोत्सवातील स्टॉलला व महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भरभरून प्रतिसाद मिळावा करिता समस्थ बुलढाणेकरांनी राजमाता महोत्सवाला येऊन भेट द्यावी व महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाची खरेदी करावी. असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे..



