बुलढाणा
*नऊ वर्षांच्या अलिजाचा रमजानचा पहिला उपवास;…*
*देशाच्या खुशहालीसाठी केली ‘दुआ’, बुलढाण्यातून सामाजिक सलोख्याचा संदेश. .*
देशात विविध विषयांवरून चर्चा आणि वाद रंगत असताना बुलढाण्यातून माणुसकी आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या अलिजा शेख मोहम्मद वसीम हिने आपल्या आयुष्यातील पहिला रमजानचा उपवास ठेवत संपूर्ण देशाच्या सुख-समृद्धीसाठी ‘दुआ’ केली आहे….
बुलढाण्यातील माऊंट सनाई इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणारी अलिजा शेख हिने १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ‘सहरी’ करून आपल्या पहिल्या उपवासाचा संकल्प केला. दिवसभर नमाज, कुरआन पठण आणि ईबादत करत तिने रमजानच्या पवित्र महिन्याची सुरुवात केली. उपवासाचा पहिला अनुभव तिच्यासाठी विशेष ठरला….
अलिजा ही स्थानिक पत्रकार वसीम शेख यांची कन्या आहे. पहिल्या उपवासाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मात्र, तिची ‘दुआ’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्वतःसाठी काहीही न मागता तिने अल्लाकडे प्रार्थना केली की, “माझा भारत देश खुशहाल राहावा आणि सर्व जाती-धर्मातील लोकांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे.”
अलिजाच्या या निरागस आणि सकारात्मक विचारातून ‘गंगा-जमुना तहजीब’ म्हणजेच सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले आहे. विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या भारताच्या संस्कृतीशी सुसंगत अशीच तिची भावना असल्याचे नागरिकांकडूनही सांगितले जात आहे….
उपवास सोडताना तिच्या आई-वडिलांनी खास पकवानांची तयारी केली होती. कुटुंबीयांनी तिचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.
अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीने दिलेला हा सामाजिक ऐक्याचा संदेश आजच्या काळात विशेष महत्त्वाचा ठरत असून, बुलढाण्यातून देशभरात सकारात्मकतेचा आणि एकतेचा संदेश देत आहे.



