बुलढाण्यातील अयमन-मदीहाचा पहिला रोजा; भारतात शांतता आणि इराण-इस्राएल युद्धबंदीसाठी निरागस प्रार्थना.

बुलढाणा
पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभी बुलढाण्यातील दोन चिमुकल्या बहिणींनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरत सामाजिक सलोखा आणि जागतिक शांततेचा संदेश दिला आहे. 6 वर्षीय मदीहा फिरदोस आणि 8 वर्षीय अयमन फिरदोस या बहिणींनी 1 मार्च रोजी उत्साहात पहिला रोजा पूर्ण केला.
सायंकाळी इफ्तारच्या वेळी उपवास सोडताना दोन्ही बहिणींनी आपल्या भारत देशात सदैव शांती नांदावी तसेच सध्या सुरू असलेल्या इराण-इस्राएल संघर्षाला पूर्णविराम मिळावा, यासाठी विशेष प्रार्थना केली. एवढ्या लहान वयात धार्मिक कर्तव्य पार पाडताना देशासाठी एकात्मता आणि जगासाठी शांततेची भावना व्यक्त केल्याने समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.
अयमन आणि मदीहा या बुलढाण्यातील पत्रकार कासिम शेख यांच्या कन्या आहेत. कुटुंबीयांनी सांगितले की, दोन्ही मुलींनी स्वतःहून रोजा धरण्याची इच्छा व्यक्त केली आणि दिवसभर उत्साहाने उपवास पाळला.
रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेतील नववा महिना असून मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात पवित्र कुरआन अवतरल्याची मान्यता आहे. इस्लाम धर्मातील पाच स्तंभांपैकी ‘रोजा’ हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी त्यागून आत्मसंयम, आत्मशुद्धी, दानधर्म आणि अल्लाहप्रती समर्पण यावर भर दिला जातो. रोज्यामुळे गरिबांच्या वेदना जाणून घेण्याची जाणीवही निर्माण होते.
दरम्यान, मोहल्ल्यातील लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत चिमुकल्यांनी आनंद साजरा केला.
अयमन आणि मदीहाने पहिल्याच रोज्यातून दिलेला शांतता व बंधुभावाचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून बुलढाण्यात त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.



