बुलढाणा ब्रेकिंग
*लोणार सरोवरावर पॅरामोटरिंगची झेप;…*
*४०० फूट उंचीवरून पाहता येणार विहंगम नजारा…*

जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात पर्यटनाला नवे पंख मिळाले असून येथे “गीतंम एडवेंचर”च्या वतीने पॅरामोटरिंग या साहसी खेळाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

या साहसी खेळामुळे आता पर्यटकांना लोणार सरोवराचे सुमारे ४०० फूट उंचीवरून विहंगम दृश्य पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. लोणारच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद आता आकाशातून घेता येणार असल्याने पर्यटकांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे सुरू झालेल्या पॅरामोटरिंगसारख्या साहसी उपक्रमांमुळे पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. शासन स्तरावरही लोणार परिसरातील पर्यटन वाढीसाठी विविध प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

गीतंम एडवेंचरचे संचालक सचिन कापुरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून पर्यटकांना अत्यंत माफक दरात पॅरामोटरिंगचा थरार अनुभवता येणार आहे. या साहसी खेळामुळे लोणार येथे देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….



