बुलढाणा ब्रेकिंग
जलशुद्धीकरण केंद्रातील हिरवीगार झाडांची कत्तल; चौकशी न झाल्यास ‘प्रहार स्टाईल’ आंदोलनाचा इशारा…

मलकापूर शहरातील नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील हिरवीगार मोठी झाडे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता कटर मशिनच्या सहाय्याने तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ८ मार्च रोजी उघडकीस आला. मात्र या घटनेला दोन दिवस उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही तक्रार किंवा ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी १० मार्च रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनानुसार, ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील मोठी हिरवीगार झाडे अमानुषपणे तोडण्यात आली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. शासनाच्या वतीने दरवर्षी झाडे लावा व झाडे जगवा अभियानासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो. नगर परिषदेद्वारे देखील झाडे लावा मोहिमेवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र त्याच नगर परिषद क्षेत्रात असलेली मोठी झाडे बेकायदेशीरपणे तोडली जात असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न होणे हे गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, झाडे तोडण्यात आल्याच्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. परंतु झाडे तोडण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना जर ती मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून तोडण्यात आली असतील, तर संबंधितांवर थेट तक्रार दाखल करणे अपेक्षित होते. मात्र केवळ कारणे दाखवा नोटीस देऊन प्रशासन पळवाट काढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
त्यामुळे झाडे कोणी व कोणाच्या सांगण्यावरून तोडली, तसेच ती का तोडण्यात आली याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही अजय टप यांनी दिला आहे.



