बुलढाणा
डोरवीच्या मनीषा कळकुंबे यांची राज्यात चमक; केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेत महिलांमध्ये दुसरा क्रमांक
सिंदखेडराजा तालुक्यातील डोरवी येथील मनीषा कळकुंबे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत महिलांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. २०० पैकी तब्बल १५७ गुण मिळवत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनीषा कळकुंबे या सध्या जालना जिल्हा परिषद शाळा, खरपुडी येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. केंद्रप्रमुख पद मिळविण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्याने अभ्यास केला आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवले. या पदासाठी सर्वप्रथम शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. त्यानंतर त्यांनी केंद्रप्रमुख पदासाठीची परीक्षा देत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात महिलांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” ही परीक्षा ३ आणि ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने तीन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. राज्यभरातून या परीक्षेसाठी एकूण ४६ हजार ६८ उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३८ हजार ५५८ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल १३ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.
मनीषा कळकुंबे यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह डोरवी गाव आणि परिसरातील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी, खरपुडी येथील शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.



