बुलढाण्यात ‘लेक हक्काची’ वृद्धाश्रमाचे उद्घाटन; निराधार ज्येष्ठांसाठी आधाराचा नवा हात
बुलढाणा
बुलढाणा शहरातील चांडक लेआऊट परिसरात ‘लेक हक्काची’ या नावाने उभारण्यात आलेल्या वृद्धाश्रमाचे उद्घाटन माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नवयुग क्रीडा शिक्षण व बहुउद्देशीय संस्था, साखळी बु. यांच्या माध्यमातून साकारलेल्या या उपक्रमामागे निराधार वयोवृद्धांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता यावे हा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुणाल शेवाळे होते. यावेळी तरुणा पाटील (वरिष्ठ भुवैधानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा), डॉ. विशाल रेंगे, अनंत गवई, सुभाष लहाने, ॲड. नाटेकर, माजी प्रशासन अधिकारी शिवप्रसाद ठाकरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सुनील शेळके यांनी सांगितले की, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. विभक्त कुटुंब व्यवस्था आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना वयोवृद्धांची जबाबदारी पार पाडणे कठीण होत आहे. अशा वेळी ‘लेक हक्काची’सारखे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कुणाल शेवाळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, येथे राहणाऱ्या वयोवृद्धांची नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आश्वासन दिले. “दर आठवड्याला भेट देऊन वैद्यकीय सेवा देण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे त्यांनी सांगितले.
तरुणा पाटील यांनी आश्रमातील रहिवाशांनी कोणताही भेदभाव न करता एकोप्याने राहावे, असे आवाहन केले आणि संस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सुभाष लहाने यांनी ‘लेक हक्काची’ हे वृद्धाश्रमरूपी रोपटे भविष्यात विशाल वृक्षात रूपांतरित होवो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालिका कु. सीमा धामणे आणि अधीक्षक रघुनाथ राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे बुलढाणा शहरात निराधार ज्येष्ठांना सुरक्षित आणि सन्मानजनक आश्रय मिळणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.



