बुलढाणा ब्रेकिंग
*बुलडाण्यात गॅस सिलेंडर तुटवडा; मेस बंद पडण्याच्या उंबरठ्यावर, स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ!..*
जिल्ह्याच्या मुख्यालयी सध्या गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत असून त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेषतः चिंचोले चौक परिसरात एमपीएससी (MPSC) पूर्व परीक्षा तयारीसाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या मेस सेवा बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आहेत.
मेस चालकांना नियमितपणे गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक मेस अर्धवट सुरू आहेत, तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवसातून एक वेळचे जेवणही मिळणे अवघड झाले आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, अभ्यासाच्या ताणात जेवणाची योग्य सोय नसेल तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या तयारीवर होत आहे. बाहेरून जेवण घेणेही महागडे ठरत असल्याने अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, मेस चालकांनीही प्रशासनाकडे तात्काळ गॅस सिलेंडर कोटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता खानावळी व मेससाठी स्वतंत्र गॅस पुरवठा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता होत आहे.



