बुलढाणा ब्रेकिंग
जिल्हा रुग्णालयात RO प्लांट धूळखात; रुग्णांना पाण्यासाठी भटकंती, प्रशासनावर प्रश्नचिन्ह…

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव उघड झाला असून, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेला RO प्लांट वापराअभावी धूळखात पडून गंजत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी प्रमुख आरोग्य केंद्र मानले जाते. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. मात्र, अशा महत्त्वाच्या रुग्णालयातच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
रुग्णालय परिसरात बसविण्यात आलेला RO प्लांट सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. देखभाल व दुरुस्तीअभावी हा प्लांट निष्क्रिय झाला असून, त्यावर गंज चढलेला आहे. परिणामी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे किंवा पाण्याच्या शोधात रुग्णालय परिसरात फिरावे लागत आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा रुग्णांना औषधांसोबत स्वच्छ पाणी मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या शासकीय यंत्रणेत अशा प्रकारची निष्काळजीपणा समोर येत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हे रुग्णालय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी तत्काळ RO प्लांट दुरुस्त करून रुग्णालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी रुग्ण व नातेवाईकांनी केली आहे.



