बुलढाणा
स्व. सुनील दैवे मृत्यूप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक व कठोर शिक्षा द्या – तेली समाजाची मागणी; मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन…
मलकापूर
बोदवड येथील स्वर्गीय सुनील दैवे यांच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी ठाम मागणी श्री राठोड तेली समाज पंचायत द्वारा संचालित श्री सोनाजी धनाजी डवले, सताजी भवन, तेली समाज बांधवांच्या वतीने मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे २३ मार्च रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनानुसार, बुधवार दि. ११ मार्च रोजी स्व. सुनील शामराव दळवे यांच्या घरासमोर काही आरोपींनी सुनील दैवे यांच्यावर गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच दि. १९ मार्च रोजी रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी अप.क्र. ३९/२०२६ मधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आरोपींना अटक न झाल्यास गावात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
स्व. सुनील दैवे यांच्या पश्चात दोन लहान मुली, वृद्ध आई व पत्नी असा परिवार असून घरातील एकमेव कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान वयात मुलींवर पितृछत्र हरपणे आणि वृद्ध आईसमोर मुलाचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, बोदवड गावात रात्री उशिरापर्यंत काही तरुणांच्या टोळक्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित गस्त घालून कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून या प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.
निवेदन देताना मिलिंद डवले, योगेश मंडवाले, संजय जामोद, सुरज मेहसरे, गजेंद्र मनसुटे, प्रवीण उमक, नागेश सुरंगे, श्याम हिंगे, रामेश्वर गोरले यांच्यासह मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.



