बुलढाणा फ्लॅश
बुलढाण्यात भीम जयंतीचा जल्लोष; आनंद शिंदे यांच्या भीमगीतांवर आमदार संजय गायकवाड यांचा ठेका

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली असून सर्वत्र जल्लोषाचे चित्र पाहायला मिळत आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार भीमगीतांनी वातावरण भारावून गेले. त्यांच्या गाण्यांवर उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत जल्लोष केला. विशेष म्हणजे, या वेळी आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या अनुयायांसोबत ठेका धरत कार्यक्रमाचा आनंद लुटला. त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार आणि उत्साहपूर्ण झाला.
या कार्यक्रमातून समता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून भीम जयंती उत्साहात साजरी केली. बुलढाणा शहरात विविध ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत असून संपूर्ण वातावरण ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेले आहे.



