- बुलढाणा ब्रेकिंग
- बुलढाण्यात तापमान 43° पार; 68 वर्षांनंतर उष्णतेचा विक्रम, नागरिक हैराण.….
- ‘थंड हवेचे ठिकाण’ ही ओळख धूसर; 1958 नंतर पहिल्यांदाच एवढी तीव्र उष्णता
बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानाने तब्बल 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे, 1958 नंतर तब्बल 68 वर्षांनी एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे. एकेकाळी ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून ओळख असलेल्या बुलढाण्याची ही ओळख आता धूसर होत चालली असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग विशेषतः त्रस्त झाला आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत असून शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी अधिक प्रमाणात पिणे, डोके झाकून बाहेर पडणे आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे सल्ले दिले जात आहेत.
वाढत्या तापमानामुळे शेती, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवरही ताण निर्माण होत असून पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



