बुलढाणा ब्रेकिंग
*“45 अंशाच्या जळत्या उन्हात CET परीक्षा; इंधन टंचाईत विद्यार्थ्यांची फरफट !”….*
*“परीक्षा केंद्रांच्या नियोजनावर पालक संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या शहरातच सेंटर द्या’ची जोरदार मागणी”*
जिल्ह्यात आज CET परीक्षेला सुरुवात होत असताना विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आधीच बुलढाणा जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 ते 47 अंशांपर्यंत पोहोचला असून दुपारी 2 ते 5 या भर उन्हातील वेळेत परीक्षा ठेवण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे परीक्षा केंद्रे विविध तालुक्यांच्या ठिकाणी देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली असल्याने खाजगी वाहनाने प्रवास करणेही कठीण बनले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी इंधन उपलब्ध नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची अक्षरशः धावपळ उडाली आहे. भर उन्हात प्रवास, वाहतुकीची अडचण, इंधन संकट आणि दुपारच्या वेळेतील परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. उष्माघाताचा धोका वाढला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. “विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की प्रवासासाठी इंधन शोधत फिरायचं?” असा संतप्त सवाल पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. परीक्षा मंडळाने वास्तव परिस्थिती लक्षात न घेता केंद्रांचे नियोजन केल्याचा आरोपही केला जात आहे. पालकांनी मागणी केली आहे की, विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या शहरात किंवा जवळच्या ठिकाणीच परीक्षा केंद्रे देण्यात यावीत. तसेच भविष्यात अशा महत्त्वाच्या परीक्षा सकाळच्या वेळेत घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परिस्थिती पाहता प्रशासन आणि परीक्षा मंडळ याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



