बुलढाणा
*डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, तहान भागवण्यासाठी राजश्री शाहू पतसंस्थेचा मदतीचा हात…*
*“एक हात मदतीचा” उपक्रमातून पेट्रोल पंपांवर शुद्ध पाण्याचे वाटप; कडक उन्हात शेतकऱ्यांना दिलासा…*
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असून अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर आणि कॅन घेऊन शेतकरी रात्रंदिवस रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे सुरू असताना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर कडक उन्हात रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी राजश्री शाहू पतसंस्थेने पुढाकार घेत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. “एक हात मदतीचा” हे ब्रीद घेऊन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर शुद्ध आरओ पाण्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
पेट्रोल पंपांवर तासनतास प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत असून अनेकांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असताना राजश्री शाहू पतसंस्थेने दाखवलेली संवेदनशीलता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, डिझेलसाठी लागणाऱ्या वाढत्या रांगांमुळे ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनत असून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.



